पावसाच्या धारा

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले जळ

हर्षलासे फार नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून खार
डोईवरी मारा झाडांचिया तळी
गुरे शोधिती निवारा

नदीलाही पूर लोटला अपार
फोफावत धावे जणू नागीणच थोर
झाडांची पालवी चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें रंगदार छबी

ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया साज
झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली पाखरें

थांबला उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें वस्तुजात खुले
सुस्नात जाहली धरणी हासली,
वरुणाच्या कृपावर्षावाने संतोषली

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत