प्रत्येक व्यक्तीच आयुष्य ही एक वेगळी कथाच

प्रत्येक व्यक्तीच आयुष्य ही एक वेगळी कथाच असते. अशी कथा जिचा पैलू न पैलू हा फक्त त्याच व्यक्तीला माहिती असतो.जगाला जे सांगितलं ते आणि जगापासून लपवलं ते देखील. अनेकदा देवाचे आपण आभारच मानावेत की त्याने मन ही गोष्ट कुणालाही दिसणार नाही अशी बनवली आहे.

    प्रत्येक व्यक्तीची स्वप्न ,आकांक्षा , दुखः आनंद ह्या सगळ्याचा विचार करताना एक गोष्ट नेहमी जाणवते ते म्हणजे प्रत्येक व्यक्ती वेगळी... त्याचे विचार , त्याचे संघर्ष आणि त्याच्या आनंदाच्या जागाही वेगळ्या....पण गम्मत अशी असते की दुसरी व्यक्ती ही आपल्यापेक्षा जास्त सुखी आहे असा गैरसमज प्रत्येकाचा असतो. आमचे मराठीचे सर नेहमी म्हणायचे बंध मुठ ही सव्वा लाखाची असते. ती उघडली की तीच रितेपण जगासमोर येत. माणसाचं पण तसच असत. मोठेपणाच ओझ हे मानेवर ठेवलेल्या सुरीसारख असत. जोवर तुम्ही मदत मागत नाही तोवर तुमची सकारात्मक प्रतिमा समोरच्या व्यक्तीच्या मनात रहाते आणि तोपर्यंतच तुमच्याविषयीचा आदर हा टिकून रहातो. तुमच्यातील माणूस म्हणून असलेल्या मर्यादा ह्या कुणी विचारात घेत नाही. त्यामुळेच तुम्हालाही कधी गरज पडू शकते , तुम्ही चुकू शकता कारण तुम्ही देव नाही ह्या गोष्टी त्यांना पचवण कठीण जात.
      मोठ्या लोकांच्या आयुष्याच्या बाबतीत जे घडत तेच सामान्य लोकांच्या बाबतीतही घडत फक्त त्याच्या आयुष्यातील संघर्षांच स्वरूप वेगळ असत. त्यांची स्वप्न, महत्वाकांक्षा ह्या मर्यादित असतात पण त्यातही हाच अनुभव आपण घेतो. खर तर ज्या गोष्टी सहज मिळतात त्यापेक्षा ज्या झगडून मिळवल्या जातात त्या जास्त समाधान देणाऱ्या असतात पण ह्या संघर्षात देखील अनेकांची मदत घ्यावी लागते . त्यातही बहुतेक लोक मदत करावी लागेल असा विचार करून तुमचा हात अर्ध्यावर सोडून निघून जातात पण जे तुमचे खरे सोबती असतात ते शेवटपर्यंत तुमच्यासोबत रहातात. वाईट वेळ किवा गरजेची वेळ यायलाच हवी कारण त्यातून तुम्हाला माणस कळतात. चुकादेखील व्हायला हव्यात कारण त्यातून आपल माणूसपण समजून घेणारी, स्वीकारणारी व्यक्ती तुम्हाला कळते. प्रत्येक व्यक्तीची कथा वेगळी ह्यासाठीच असते कारण ह्या आयुष्याच्या रणांगणात एखाद्याच्या पाठीशी कुणी श्रीकृष्णासारखा सखा प्रत्येक वेळी उभा रहातो तर एखाद्या व्यक्तीच्या नशिबात वाल्याच्या कुटुंबासारखी संघर्षाच्या क्षणी पाठ फिरवणारी माणस असतात. प्रत्येकाची कथा वेगळी आणि व्यथाही वेगळी.

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत