शिक्षणाचा खेळखंडोबा

शिक्षणाने मानुस मोठा होतो ,   शिकल्या सवरल्याने  मनुष्यला योग्य - अयोग्यतेची जाणीव होते, शिक्षणानेच मानुष्य प्रगती साधु शकतो  आणि शिक्षण हे तर बाघिनिचे दूध आहे आणि हे दुध पिल्या नंतर मानुस गुरगुरल्या शिवाय राहत नाही असे ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. शिक्षणाचे खरे महत्व क़ाय हे तेव्हा कळले।
शिक्षणाची मोठी परंपरा लाभलेल्या या देशात पूर्वी  गुरुकुल  शिक्षा पद्धति अस्तित्वात होती  आणि आज देखील प्रख्यात शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांच्या माध्यमातून आपल्याला उच्च दर्जाचे शिक्षण मिळत आहे. परंतू आज जागतिकीकरणाच्या युगातच या शिक्षणाचा खेळखंडोबा का झाला? याची बरीच कारणे आहेत. शिक्षण हे दान राहिले नसून तो आता एक प्रकारे कॉरपोरेट व्यवसाय होऊन बसला आहे.

सोबतच  नोकरी मिळविण्याचे साधन म्हणून देखील शिक्षणाकडे पाहण्याची प्रवृत्ती वाढीस लागली हे महत्त्वाचे कारण सांगता येईल. कारण की चांगले शिकले म्हणजे चांगली नोकरी मिळेल असा गोड़ गैरसमज आजकाल पालकांच्या मनात येत आहे. अर्थात ते बऱ्यास अंशी योग्यही आहे. मग याचबरोबर येणारा नोकर भरतीतील भ्रष्टाचार, कारकुनी पद्धतीचे शिक्षण, अभ्यासक्रमातील दोष, संस्थाचालकांचा हस्तक्षेप आणि त्यामुळे शिक्षणाचे झालेले बाजारीकरण या बाबी खेळखंडोबा होण्यास कारणीभूत आहेत. या व्यतिरिक्तही अनेक कारणे सांगता येतील.

आजकालचे पालक स्वतःच्या पोटाला चिमटा देऊन मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यास कोणत्याच प्रकारची कसर शिल्लक ठेवत नाही. इतके त्यांनी शिक्षणाचे महत्व जानले आहे. आणि याचाच गैर फायदा घेऊन काहिनी आपली शैक्षणिक दुकाने थाटली आहेत

कोणत्याही क्षेत्रातील शिक्षण असो, आज जागतिकीकरणाच्या युगात शिक्षणाला बाजारू स्वरूप प्राप्त झालेले आहे. मूळात विद्यार्थ्यांना अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांवर आजच्या व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे. त्यांच्यावर व्यवस्थेमुळे विविध बंधने येत आहेत, काहीवेळा आणली जात आहेत. विनाअनुदानित तत्त्वावर बरेच प्राध्यापक कित्येक वर्षे काम करत आहेत. परंतु संस्थाचालकांचा हस्तक्षेप आणि प्राचार्यांचा बुजगावणेपणा ,सरकारचे महाविद्यालयांतील विविध बाबींवर नसणारे नियंत्रण किंवा या दोहोंचे असणारे लागेबांधे यांमुळे विनाअनुदानित तत्त्वावरील या प्राध्यापकास न्याय मिळत नाही. उपाशी पोटी ज्ञान देणे आणि ज्ञान घेणे ह्या दोन्ही गोष्टी आजच्या काळात न केलेल्याच बऱ्या. अर्थात शिक्षणप्रणालीमध्ये यामुळे काय फरक पडत असेल हा संशोधनाचा मुद्दा आहे.

असो, राज्यात आज कितीतरी शाळा विना अनुदानित तत्वावर सुरु आहेत  आणि त्यातही शासनाने शिक्षक भरती बंद केलेली आहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून शासन प्रत्येक गांव खेड़यात शिक्षणाचा अधिकार या  घटका अंतर्गत प्रत्येक सर्व सामान्य मुला पर्यंत शिक्षण पोहचविन्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हे अभियान खरच यशस्वी होत आहे का? कारण की अलीकडे प्रार्थमिक शाळा या बहु अंशी  केवळ गप्पा मारण्याच्या आणि गले लट्ठ पगार मिळविन्या पुरत्या मर्यादित राहिल्या आहेत. या उलट कॉन्वेन्ट कड़े पालकांचा कल जास्त दिसून येतो आहे केवळ मुलाला इंग्रजी बोलता ,वाचता येते बस्स मात्र एवढेच आजकालच्या पालकाना त्याचे अप्रूप वाटत आहे. परंतु केवळ इंग्रजी येणे म्हणजे गुणवत्ता नव्हे हे समजने देखील तेवढेच गरजेचे आहे. या कॉन्वेन्ट कड़े कल वाढण्याचे कारणही तसेच आहे, सरकारी शाळांचा दिवसेंदिवस खालावत चाललेला दर्जा, शाळांची दुर्दशा , शिक्षकाना  नसलेले संगनकाचे ज्ञान ई. तसेच शिक्षाकाना दिल्या जाणारी अशैक्षणिक कामे हे देखील एक मुख्य कारण आहे ज्यामुळे शिक्षक आपले पाठ्यक्रम पूर्ण करु शकत नाही. या मुळे विद्यर्थ्यांचा अपुर्या  शैक्षणिक गुनवत्ते बरोबरच व्यक्तिमत्व विकास देखील
खूंटतो आहे.

शिक्षणाचा खेळखंडोबा होण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे अभ्यासक्रम. पारंपरिकते बरोबर नवीन अभ्यासक्रम स्विकारायला आपली अभ्यास मंडळे का तयार होत नाहीत? हा सुद्धा आणखी संशोधनाचा मुद्दा आहे. काळानुरूप अभ्यासक्रम बदलायला हवेत जेणेकरून कोणताही विद्यार्थी काळाच्या ओघात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर टिकू शकेल. अभ्यासमंडळांमध्ये अशा प्रकारचे गट आहेत जे स्वत:च्या ओळखीच्या फडतूस लेखकांच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करतात. ही पद्धत रूढ झाल्यामुळे प्राध्यापकांना ती नाइलाजास्तव शिकवावी लागतात आणि विद्यार्थ्यांनाही सहन करावी लागतात. परिणामी विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास होत नाही. एकच एक दृष्टिकोन तयार होतो. यावरही नियंत्रण असायला हवे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देता येईल. मराठीसारख्या विषयामधून नोकरी, व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उदा. पटकथालेखन, पत्रकारिता, मुद्रितशोधन, प्रकाशनव्यवसाय, सुत्रसंचालन, नियतकालिकांचे संपादन, भाषांतरकार इत्यादी. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासक्रमाची गरज आहे, असे प्रत्येकच विषयात/क्षेत्रात योग्य अभ्यासक्रम तयार करायला हवेत.

शिक्षणातील खेळखंडोबा होण्यासाठी सर्वात जास्त कोणती गोष्ट कारणीभूत असेल तर, ती आहे नोकरभरतीतील भ्रष्टाचार. या वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दूषित झाला आहे. नोकरभरतीत पैशाची देवाण घेवाण केली जाते त्यामुळे गुणपत्ताधारक विद्यार्थ्याला डावलले जाते. अशा चांगल्या विद्यार्थ्याला डावलल्यामुळे विविध दोषांनी परीपूर्ण असलेले शिक्षण विद्यार्थ्यांना मिळते परिणामी त्यामधून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे पहावयास मिळते. सरकार विविध शिक्षणसंस्थांना भरभरून अनुदान देते परंतु ते विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी वापरले जाते का?

भारतावर इग्रंजानी तब्बल दिडशे वर्ष राज्य केले. आपल्या मधून कारकून निर्माण करण्याच्या दृष्टीने भारतीय शिक्षणाचा पाया घातला गेला. हे सर्वज्ञात आहेच. पण तीच शिक्षणपद्धती आज लागू केली जात असेल तर, हे आजच्या काळात तरी पटण्यासारखे नाही. मग असा प्रश्न निर्माण होतो की, आपण स्वातंत्र्यात आहोत की पारतंत्रात? आपण उदयाची नवी पिढी घडवतोय की कारकून? भारत महासत्ता कसा होईल हा तर फारच मोठा प्रश्न आहे. एकीकडे आपण मंगळापर्यंत मजल मारली परंतु दुसरीकडे आपल्याच देशात आपल्या उदयाच्या भावी पिढीमुळे काय प्रश्न आहेत. याच्याकडे आपण कधी पाहणार आहोत. आजच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झालाच आहे. अपवादात्मक काही शिक्षण संस्था वगळता सर्रास संस्थाचालकाचा होणारा हस्तक्षेप, अभ्यासक्रमातील दोष, नोकरभरतीतील भ्रष्टाचार, कारकुनी पद्धतीचे शिक्षण, या सर्व बाबींमुळे आपली भावी पिढी काळाच्या ओघात टिकू शकेल की नाही हा मोठा प्रश्न आहे. आज देशभरात असंख्य ठिकाणी उच्चशिक्षण, तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत आणि त्यामध्ये दरवर्षी भर पडत आहे. आपल्या शिक्षणाचा हेतू काय आहे? हेच अजून बऱ्याच अंशी समजलेले दिसत नाही. आणि त्यामधून भविष्यकालीन ध्येयधोरणे निश्चित झालेली दिसत नाही. शिक्षणाचा हेतू विशिष्ट विषयातील ज्ञान संपादन करणे व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून घेऊन समस्यांचे निराकरण करणे जीवन अधिक सुखी, सुरक्षीत, सुसह्य करणे हा आहे. ही गोष्ट आपल्या विस्मरणात गेली आहे.

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत